भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Friday, December 13, 2024

🙏 ग्रृहीत 🙏


                  🌺"गृहित "🌺
दुपारी दोन वाजले असावेत. मोबाईल ची रिंग वाजली, पलिकडुन आवाज आला 'काय चाललय आराम का? बर्‍याच दिवसांत फोन नाही गाठभेट नाही विसरलात का' 'एकाच दमात अनेक प्रश्न विचारले गेले. आवाज ओळखीचा वाटला नाही. पण प्रतिप्रश्न करुन आपण कोण बोलताय हे विचारायला संकोच वाटु लागला "नाही ना ओळखलं, नाहीच ओळखणार तुम्ही आम्हाला" पलिकडुन पुन्हा वन वे बोलण सुरु....... 'अहो मी पद्माकर बोलतो, आतातरी ओळखलं का? आपण बंडीच्या लग्नाच्या वेळी भेटलो होतो. जेवायला शेजारी शेजारी बसलो होतो.. आठवले कां?' मला तर काहीच आठवत नव्हते कोण पद्माकर कोण बंडी...... पण अगदिच विसराळू ठरू नये म्हणून मी घाईने हो हो ओळखले ओळखले सांगीतले व सुटलो बुवा म्हणून निश्वास टाकला पण तो अल्पावधीत असफल ठरला."सांगा बर मला काय म्हणत लहानपणी " पलिकडुन दणका.. काय सांगावे बरं... काही तरी उत्तर देणे भाग होते. 'अरे बंड्या ना तुम्ही ' मी पण ठोकितो ऐसाजी कि धिटाई केली, समोरच्यांची प्रतिक्रिया काय येते याची प्रतीक्षा करावी लागलीच नाही. खो खो चा स्फोट झाला. "वा वा काय तुमची स्मरणशक्ती माझं टोपणनावही लक्षांत आहे तर तुमच्या." तर मी काय सांगत होतो आमचे सासरे सदाशिव जोशी हे उध्या पुण्यात येत आहे. त्यांना थोडी मदत हवी आहे. आपण त्यांना नक्की मदत कराल अशी आशा आहे. त्यांचे काय काम आहे ते आपल्याला समक्षच सांगतील. असो मी फोन ठेवतो." अन फोन बंद झाला. आता मी खरोखरच निश्वास टाकला. पण फोन कोणाचा होता शेवट पर्यंत कळले नाहीच.
दुसर्‍या दिवशी मी हा फोन चा सर्व विषय संपुर्णपणे विसरून गेलो. 
                      दुपारी चार वाजतां घरा बाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला. 
कोणीतरी ग्रहस्थाचे व रिक्षा चालकाचे जोरात बोलणे ऐकु आले. रिक्षाचालकाकडे पैसे सुटे नसल्याचे व त्या ग्रहस्थाकडे पांचशेची नोट असल्याचे साधारण पणे त्यांचा संभाषणाचा विषय होता. थोड्यावेळांत दरवाजाची बेल वाजली. दारांत पंचावन्न ते साठ वयाचे एक उंच, झुपकेदार मिशा असलेले शर्ट व धोतर पेहेराव केलेले ग्रहस्थ उभे होते. 
"नमस्कार मी सदाशिव जोशी, पद्माकर कुलकर्णी मनमाड यांचा सासरा. आपणांस काल त्यांनी फोन केला होता." 
'हो हो केला होता फोन ' मी तुटक तुटक उत्तर दिले. असं करा पांचसेचे सुटे द्या '. "सुटे नाही माझ्या जवळ "मी झटकायचा प्रयत्न केला.' 'बरं मग १७८रु द्या त्या रिक्षाचालकाला मी सुटेकरुन देतो तुमचे' 'आता पळवाटा बंद झालेल्या दिसल्या. पाकिटातून १८० ₹काढुन दिले. तोपर्यंत सदाशिवराव सोप्यावर स्थिरावले. सौ ने पाणी आणुन दिले तांब्या तोंडाला लावुन घटघटा पाणी पिऊन मिशांवरील पाणी हाताने पुसत "मला थोडा गोड चहा पण भरपुर लागतो" किचनकडे पहात सदाशिवराव पहाडी स्वरात वदते झाले ". 
मी आपला बापडा खुर्चीवर बसून हे सारे बघत होतो. सौ ने तत्परतेने तीन कप चहा आणला. एक कप माझ्या हातात देऊन दोन कप सदाशिव रावांच्या पुढ्यात टिपायवर ठेवले. एका मागोमाग एक करीत दोन्ही कपचहा चविणे फुरक्या मारत संपवून सदाशिवराव उठले, बॅगेतुन पंचा व स्नानाचे कपडे घेत " राजे कुठे आहे बाथरूम मी स्नान केल्याशिवाय काहीच करत नाही प्रथम स्नान" मी भानावर आलो मलाच राजे संबोधतीत होते ते...... मी झटकन उठुन याना याना म्हणत  त्यांना आंत नेऊन बाथरूम दाखवून गरम गार पाण्याचे नळ दाखवुन, थोडे मार्गदर्शन करुन बाहेर आलो.
 मधल्या घरांत आई, पत्नी, दोघंमुलं दबा धरून माझी वाटच पाहत होते." कोण हो हे पाहुणे "सौ चा पहिला प्रश्न उत्तरासाठी तोंड उघडले पण काय सांगणार नक्की कोण. "अग माझ्या मित्राचे सासरे" कोण मित्र दुसरा प्रश्न जुळ्या भावासारखा पुढे आला "अग तो बंड्या" कालच्या फोन चा संदर्भ आठवत मी बोलुन गेलो.." बाबा त्या आजोबांच्या मिशा फारच लफ्फेदार आहेत ना" मंदार वदला चिरंजीवांच्या निरिक्षण शक्तीचा प्रत्यय आलाच. "सदाशिव पेशवेच दिसतांत जसे "कन्या रत्नाची मुक्ताफळे. आई ने मात्र "अतिथीदेवो भव" बरं भास्करा असु दे असु दे 'म्हंटले मला जरा धिर आला. मी थोडा स्थिर झालो कालच्या फोन चा विचार करू लागलो.. थोडे थोडे स्मरण होऊ लागले दोन वर्षे झाली असतील एका लग्नांच्या समारंभात जेवणाच्या पंगतीत एक पन्नासीचे ग्रहस्थ शेजारी बसले होते. सहज म्हणून बोलणे झाले. 
जेवत असताना येणाऱ्या प्रत्येक वाढप्याला 'अरे साहेबांना वाढ... जिलेबी वाढ असा अग्रह चालला होता त्याचा. मला पंगतीत खुप संकोच वाटतो पण शेजारच्या त्या ग्रहस्थाने आग्रह करुन करून मला पोटभर खायला लावले. मी ही त्यांना आग्रह केला. पानाचाविडा घेतांना थोडी जुजबी माहितीची देवाणघेवाण झाली. मी त्यांना विचारले मला जेवताना का आग्रह करत होता हो असे विचारले त्यावर त्यांनी सांगितले "अहो पंगतीत मागायला लाज वाटते म्हणुन शेजारच्या ला आग्रह करायचा मग तोही आपल्याला आग्रह करतो." त्याचे हे आग्रहशास्त्र सडेतोड असले तरी माझ्या पचन पडले नव्हते.. त्यानंतर फोन नंबर ची देवाण घेवाण झाली. माझा पत्ता त्यांनी काळजीपूर्वक टीपुन घेतला होता. 
एकंदरीत आता थोडं तरी कोडे उलगडले होते. पण या जुजबी ओळखीमधुन स्वतः च्या सासर्‍यांना थेट घरी पाठविणे जरा जास्तच होतंय असं वाटुन गेलं. 

सदाशिवरावांची आंघोळ आटोपली. "मला जेवायला अगदी साधं विना तिखट लागते. भाजी कोणत्याही चालते" स्पष्ट पणे मेनु ऐकवला गेला. पुन्हा एकदा चहा झाला. मुलांना समोर बोलावून काय शिकता, व्यायाम करता कां, कुठलेखेळ खेळता. शुभंकरोती म्हणून दाखवा इ. इ. आजोबापण दाखवून झाले. जेवण चवीने जेवले. रात्री मुक्काला घरचा हाॅलच पसंत असल्याचे  त्यांनी सांगितले व हाॅलमध्येच सोप्या वर झोपले.
     दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून सदाशिव राव खड्या आवाजात अभंग म्हणत होते त्या आवाजाने मला जाग आली. सर्व ऐहिके उरकली, चहा नाष्टा आटोपला. 
. "जरा माझ्या बरोबर येता का? "अशी विनंती सदाशिवरावांनी केली. मला सुटी   होती मला नाही म्हणताच आले नाहीच. चला निघु या  मी व सदाशिवराव रिक्षा करुन निघालो. एका मोठय़ा हाॅस्पिटल समोर जाऊन रिक्षा थांबली. "तुम्ही थांबा मी येतो आतुन" 
सदाशिवराव म्हणाले व छोटी जडसी कातडी बॅग घेऊन घाईने आंत गेले. मी वेटिंगरुम मध्ये आरामात बसून राहिलो. कोणबरे आजारी असावे यांचे असा विचार करित किती वेळ गेला कळलेच नाही. दिडदोन तासानंतर सदाशिवराव आले. त्यांच्या बरोबर दहाबारा पुरुष, स्त्रीया, मुलं घोळक्याने आली. पुरुषमंडळींनी अत्यंत आदराने मला हात जोडून नमस्कार केले. सदाशिवरावांनी माझा परिचय करुन दिला. व माझा पत्ता ही दिला. सारा घोळका रिक्षा पर्यंत आम्हाला सोडवावयाला आला. आम्ही दोघे घरी आलो. "चला आता अतिथी जायेगे" असे म्हणत सदाशिवराव मोठ्याने हसत हसत म्हणाले.. हक्काने सौ कडे चहा मागीतला. सदाशिवरावांनी आई ना मात्र  अगदी वाकुन नमस्कार केला. चहा घेऊन आमचा निरोप घेऊन ते रिक्षाने निघुन गेले. 
दोन चार दिवसात आम्ही सारे सदाशिवरावांना विसरलो. नेहमीचे आयुष्य सुरु झाले. 
साधारण दहा बारा दिवसांनी दुपारी एक पार्सल आले. कुणा कडुन आले हे पाहून ताब्यात घेतले. सदाशिवराव जोशी मनमाड. यांचे कडुन आले होते. पार्सल उघडले. आत दोन भरजरी साड्या, दोन शर्ट, पॅन्ट पिस, एक ड्रेस चे कापड, एक चिठ्ठी व एक चेक. चिठ्ठी त लिहिले होते 
चि. भास्करा 
अनोळखी माणसांसाठी तुमचे कुटुंब इतके झटले एका शब्दाने ही दुखविले नाही की चेहर्‍यावरील स्मित ढळु दिले नाही. रिक्षाचे भाडे ही परत मागितले नाही. मी आणी जावयाने आपणांस "गृहीत" धरले. पण आपण मात्र अतिथीदेवो भव"धर्म मनोभावे पाळला. 
अतिथी म्हणून मी फुल ना फुलाची पाकळी पाठवीत आहे. मोकळ्या मनाने स्विकारावे. 
सदाशिव. 
चेक ची रक्कम बघुन डोळेच विस्फारले १८०००/_₹.प्रत्यय आला, एक दाणा पेरला की हजार दाणे उगवतात. 
इतक्यात एक अनोळखी इसम दारांत आले" येऊ का आंत "चेहेरा ओळखीचा वाटला पण नक्की कोण. या या म्हणून त्यांना आंत घेतले. "आपली ओळख सदाशिवकाकांनी करुन दिली होती हाॅस्पिटल मध्ये." संदर्भ लागला. ते सद्गृहस्थ पुढे म्हणाले" आम्ही निघतो आहोत मनमाड ला माझे वडिल आजारी होते त्या दिवशी तेथे हाॅस्पिटला. ह्रदय शस्त्रक्रिया होती. हॉस्पिटल चे बील एकविस लाख भरायचे होते. ते सदाशिव काकांनी त्या दिवशी आणले होते ते त्यांनी भरले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एका फोनवर काका स्वतः रोकड घेऊन आले. हाॅटेलवर रहाणे सुरक्षित नव्हते, पद्माकरने आपले नांव सुचविले. म्हणून ते आपल्या कडे रहायला आले होते. फार फार आभारी आहे आपला.
एका देव माणसाने आपल्याला "गृहीत" धरले याचा आनंद मात्र आयुष्य भर आनंद देत रहाणार आहे. 
©®
भास्कर पवार 
पुणे आकरा फेब्रुवारी २०२१ 
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏




No comments: