या पुस्तकाची कथा संकल्पना : अंतिमतः
या सिद्ध योगिंद्राच्या कथेचा बाज अध्यात्मिक असून त्यात उत्तूंग कल्पनेची भरारी जरी भासली तरी त्यात मानवी आकलना पलीकडील सिध्द जगतातील गुह्य सत्यांश ठासून भरलेला आहे .
चा कथेचा थोडक्यात सारांश सांगता येईलही परंतु त्यात जागो जागी आलेली अदभूतता अवर्णनीय अशीच आहे...
सिद्ध योगिंद्राच्या श्रीगुरुंनी त्याला आश्वासन दिल्याप्रमाणे ते त्याला तीनशे वीस वर्षांनी भेटणार आहेत. त्याचे श्रीगुरू, चिरंजीवी महावतार बाबाजी यांच्या सोबत अंतरिक्षातील अँड्रोमेडिया आकाशगंगेतील एका ग्रहावर काही महत्त्वाच्या मोहिमेकरिता गेलेले आहेत. सिद्ध योगिंद्राचा त्याच्या गुरुंशी अनुसंधानाने नित्य मानसिक संपर्क आहे परंतु त्यांची प्रत्यक्ष दैहिक भेट होऊ शकत नाही, यामुळे योगिंद्र श्रीगुरुंच्या भेटीकरिता अस्वस्थ आहे. वृद्ध योगिंद्राचे आजचे वय जवळ जवळ ३२५ वर्षांचे असल्याने, मृत्यूमुळे श्रीगुरुंच्या दिव्य भेटीपासून योगिंद्र वंचित राहू शकतो, या शंकेने ग्रासीत होऊन तो आपले आयुष्य वाढविण्यासाठी काही अलौकिक उपाय योजना शोधून काढतो. त्यात तो प्रथम परकाया प्रवेशाचाही विचार करतो, त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान भूतकाळात जाऊनही तो मिळवितो. पुढे हि कल्पना व्यवहार्य न वाटल्याने तो ती सोडून देतो , नंतरच्या त्याच्या प्रयत्नांत कैलास स्थित, मानस सरोवरा नजीक परंतु चौथ्या मितीत (fourth dimention) असलेल्या श्री महावतार बाबाजी यांच्या सिद्धाश्रमात योगिंद्र मोठ्या हिकमतीने व मानसिक धैर्याने प्रवेश मिळवितो आणि कायाकल्पाच्या अत्यंत खडतर जीवघेण्या प्रक्रीयेला दृढनिश्र्चयाने सामोरे जावून, तेथील अनुभवी ऋषीं मार्फत स्वतःवर कायाकल्पाचा प्रयोग सिद्ध करवून पुन्हा अद्वितीय तारुण्य प्राप्त करुन घेतो.
या सिद्धाश्रमातच त्याची भेट पाच हजार वर्षापासून तेथे ध्यानस्थ असलेले त्याचे पूर्वजन्मीचे काका, म्हणजेच महाभारत कालीन विदूरजींशी मानसिक संपर्काने होतो, त्या अनुषंगानेच तो त्याच्या पूर्वजन्मांत महाभारतकालीन 'युयूत्सू'च असल्याचे त्याला समजते. तसेच त्याला श्री महावतार बाबाजी यांच्या योजनेनुसार आपल्या गत कर्मविपाकाचे ज्ञानही सिध्दाश्रमांतच होते, या गतकालीन कर्मविपाकाचे निवारण करण्यासाठी योगिंद्राला भारतीय 'राॅ' एजन्सीतील प्रमुख डायरेक्टर श्री रणविजय सैनी, जो योगिंद्राचा पूर्वाश्रमीचा महाभारत कालीन बंधू 'विकर्ण' , तसेच महाभारत कालीन त्याची भगिनी 'दुशाला' या दोघांना भेटणे आणि त्यांना त्यांच्या सद्यस्थितीत मदत करून , वेळ प्रसंगी एल ओ सी बॉर्डर पलीकडील अतिरेक्यां पासून त्यांना संरक्षित करणे, हे त्याच्या कर्मविपाका नुसार आवश्यक असते, या करीता तो आपल्याला अवगत असलेल्या अनेक सिद्धींचा आवश्यकते नुसार वापरही करतो. अखेर तो या सर्व धडपडीत यशस्वी होतो कां... आणि श्री गुरु तसेच पूज्य चिरंजीवी श्री महावतार बाबाजी यांच्या प्रशंसेस पात्र होतो कां.... हा सर्वच कथाभाग अत्यंत रोचक आणि पानोपानी उत्सुकतावर्धक आहे...
या कथेचा गाभा काल्पनिक असला तरी यातील सर्व यौगिक वर्णने म्हणजे सिद्धांसोबत मिळविलेले सत्य ज्ञानाचे कण आहेत, आणि स्थल, काल वर्णनेही वस्तूस्थितीवर आधारीत आहेत.
अधिक काय सांगणार .... वाचाच तर मग.
................. निर्मलचंद्र पवार
२३-०६-२०२१

No comments:
Post a Comment