१९६५/६६ चा काळ असावा, मी शहादा आगारांत रूजु होऊन ४/५ महिने झाले होते. आगारांत त्या वेळी विभाग नियंत्रकाची भेट म्हणजे एक फार मोठी गोष्ट असायची.त्यादिवशी विभाग नियंत्रक व कांही आधिकारी शहादा आगाराला भेट देणार होते. सर्व बसेस, आगार, स्थानक, स्वच्छतागृहे, कॅन्टीन पुर्ण परीसर झकपक व स्वच्छ करवुन घेतलेला होता . ज्यांना गणवेश आहेत, ते चालक, वाहक, टिसी, स्थानकप्रमुख गणवेशांत होते. ठरल्यावेळी विभाग नियंत्रक डॉ. पटवर्धन साहेब, कामगार आधिकारी ,झेड एम शिंदे साहेब ,व इतर एक दोन आधिकारी आगारांत आले. आगार, स्थानक, इ. ची तपासणी करून आधिकारी आगार प्रमुख यांचे कक्षात येऊन बसले. कामगार आधिकारी आगारांत कामगारांना वैयक्तिक रीत्या भेटुन त्यांच्या तक्रारी वहीत लिहून घेत होते. रजा, पगार, प्राफंड या स्वरुपातील तक्रारी लिहून घेतल्या जात होत्या. (विभागात गेल्यावर प्रत्येक शाखेत जाऊन त्या तक्रारींची सोडवणुक करवून घेतली जात असे)
विभाग नियंत्रक, यांनी एक प्रथा चालू केली होती. की डेपोला गेल्या वर कामगार, चालक वाहक, सुपरवायझर यांची एक मिटिंग आयोजित करुन त्या त्या आगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घ्यायचा, व त्याच वेळी प्रशासनाच्या अपेक्षा, कामकाज, या बाबतीत ही कर्मचाऱ्यांना अवगत करणे हे ही मिटिंग चे उद्दिष्ट असे.
या मुळे कामगार व प्रशासनातील अंतर कमी होउन प्रवाशांची सेवा आधिक चांगली होईल असे त्यांना वाटत होते. व हे खरे ही होते.
त्या दिवशी अशी मिटींग घेण्यात आली. डेपोत आगार प्रमुखांच्या कक्षा च्या समोर टेबल खुर्च्या मांडून स्टेज तयार केले होते व, त्या समोर ताडपत्र्या, सतरंज्या पसरुन बसण्याची सोय केली होती, व ही मिटिंग आयोजित करण्यात आली. या मिटिंग ला ४०/४५ कामगार व १०/१२ सुपरवायझर हजर होते. विभाग नियंत्रक व आधिकारी, आगर प्रमुख, समोर स्टेजवर स्थानापन्न झाले होते. मिटिंग मध्ये बर्याच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. मेंटेनन्स व ब्रेकडाउन बाबत मात्र चालक व मेकॅनिकल स्टॉफ यांत गरमागरम चर्चा झाली, व बराच वेळ गेला तरी तोडगा निघाला नाही. डॉ पटवर्धन यांनी उभे राहून सर्वानां शांत राहाण्यासाठी सांगीतले व मध्यस्ती करीत याबाबत तोडगा काढण्यासाठी काही प्रस्ताव सांगीतले. या वर चर्चा होऊन तोडगा निघू लागला, इतक्यात आगारातील एक जुने चालक श्री पुजारी हे ड्युटी संपवून डेपो त तावातावाने आले व हातात असलेले लाॅगशिट विभाग नियंत्रकांच्या अंगावर फेकले, व मोठ मोठ्या ने ओरडत सांगु लागले "अशा गाड्या देतांत ड्रायव्हर ला, दहा दहा दिवस लाॅगशिट वर रिमार्क असुनही अशा गाड्या देतांत, आमचा जीव घेणार का आता. सकाळी सहा वाजता येणारी गाडी आता एक वाजता येत आहे, बीना नाष्टा, जेवन आमचे काय होते आहे का कुणाला काही.? काय मिटिंगा घेत बसले, बघा त्या गाडीची परिस्थिती... गाडी नाकारली म्हणून चार चार्ज सिट देता, आता द्या चार्ज शिट डिसमिस करा.. मिटिंगा घेता हेत...". यावेळी पुजारींचा आवाज टिपेला पोहचला होता. सारे आवाक होऊन बघत राहिले. काय करावे कुणाला ही सुचेना.विभाग नियंत्रक, कामगार आधिकारी, आगार प्रमुख एकमेकांकडे बघत होते. काय करावे कुणाला ही कळत नव्हते. दहा पंधरा मिनिटे झाली मिटिंग तर स्तब्ध झाली होती. एक वयस्कर चालक तात्या मिटिंग मधुन उठुन स्टेज कडे आले. पुजारींचा हात धरुन "चला पुजारी बस्स करा. चला. पुजारीनी वळुन पाहीले, थोडे शांत झाले. मग त्यांच्या त्या वयस्कर मित्राने त्याच्या हाताला धरून त्यांना आगारा बाहेर घेऊन गेले.
आगार व्यवस्थापकांनी मिटिंग बरखास्त झाली असे जाहीर केले.
विभाग नियंत्रक यांनी पुजारींनी फेकलेले लाॅगशिट घेऊन आगार व्यवस्थापक यांचे कक्षात सर्व आधिकारी व सुपरवायझर सह निघुन गेले. तेथे विषय निघाला तो पुजारी यांना निलंबित करण्यात यावे या बाबत. पण विभाग नियंत्रक व कामगार आधिकारी यांनी प्रथम गाडीच्या लाॅगशिट वर चर्चा केली. व त्या पुर्वी च्या लॉगशीट मागवुन घेऊन एडब्लुएस यांच्या सी प्रदीर्घ चर्चा केली. जे दोष गेला महिनाभर त्या बसमध्ये होते ते एकास्पेअर पार्ट मुळे येत होते. तात्पुरता पार्ट दुरुस्त करुन लावला की ठराविक किलोमीटर रनिंग नंतर तो नादुरुस्त होत असे. त्याची मागणी पण केलेली होती. विभागीय स्टोअर मध्ये तो नसल्याने तो येत नव्हता व आगार प्रमुखांच्या लोकल खरेदी रकमेच्या आधिकारांत तो बसत नव्हता. यावर त्वरित उपाय म्हणून विभाग नियंत्रक यांचे पावरमध्ये तो पार्ट शहादे येथेच खरेदी करून घेण्यासाठी ची कार्यवाही करण्यात आली.
इकडे डेपो व स्थानकावर कर्मचाऱ्यांत चर्चा सुरू होती की आता पुजारी चालक सस्पेन्ड होणार
त्याची च आर्डर निघत आहे. मिटिंग मध्ये येऊन गोंधळ घातला आहे. आता पुजारी चे खरे नाही. इ. इ.
आगार व्यवस्थापकांच्या कक्षांतही नंतर पुजारी यांचे वर काय कारवाई करण्यात यावी यावर चर्चा झाली.
विभाग नियंत्रक व कामगार आधिकारी यांनी या सुचना केली की, चालक वाहक यांची कामगिरी इतर कामगारांच्या सारखी नसते. त्यांना दिवसांत कमीत कमी दहा तांस तरी बसमध्ये काम करावे लागते. ऊन, पाऊस, सणवार, काही ही असले तरी त्यांना काम करायला लागते. चालकास तर डोळे, कान, मेंदू यांवर प्रचंड ताण देऊन काम करावे लागते. पन्नास प्रवाशांचे प्राण त्याच्या हाती असतांत. अशा वेळी गाडी ना दुरूस्त अवस्थेत चालविणे किती जिकिरीचे असते. याचा सारासार विचार करून च आजच्या चालकास शिक्षा दिली पाहिजे.
आणी पुजारी यांना फक्त एक साधी ताकीद देण्यात यावी असे ठरले.
तात्यांना पुजारींना घेऊन येण्यास सांगितले. झाले पुन्हा कुजबुज सुरू झाली, आता पुजारी डीसमिस होणार आता आर्डर मिळणार.
तात्या पुजारी चालकास आगार व्यवस्थापकांच्या कक्षांत घेऊन आले. पुजारी यांनी आल्या आल्या सांगीतले "माफ करा मला, मी वैतागून बोललो सकाळी. विभाग नियंत्रक यांनी त्यांना खुर्ची वर बसायला सांगितले." घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळजी घ्या ती बस आता दुरुस्त झाली आहे. चालवून बघा. पण तुम्हाला ताकिद मात्र दिली आहे.
तुमचे गार्हाणं खरे आहे. पण मिटिंग संपल्यावर, योग्य पध्दतीने योग्य आवाजांत सांगितले पाहिजे होते." असे अगदी मना पासून सांगितले.
एक चांगला धडा त्या दिवशी शहादा आगारांतील कर्मचारी व अधिकारी यांना मिळाला.
असे आधिकारी!!
भास्कर पवार
पुणे
०८/०१/२०२२.

No comments:
Post a Comment