भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Saturday, December 27, 2025

👤तोवरच आपण निघुन जावे👤


मला असं वाटतं आपण वाचा पटंत का. 
🌹तोवरच आपण निघून जावं ..🌹..

घर भरलेलं असावं,
सौख्य सर्वत्र नांदत असावं,
नातवंडांनी अंगण गजबजलेलं असावं, 
डोळ्यापुढं संसारसूख बरसत असावं,
          वाटते तोवरच आपण निघून जावं !
कधीच फसवणूकीचे आरोप नसावेत,
कुणाच्या कपर्दीकेला हातही लागले नसावेत,
ऋणात कोणाच्या कधीच नसावं,
आपणातच भरभरून देणारं मन असावं 
          खरंच, तोवरच आपण निघून जावं !
शब्दाला जोवर मान मिळत असावा,
त्याचा अभिमान जरूर असावा,
संकटात कोणि आपणावर भिस्त ठेवून असावा,
त्याचा हा दावा वृथा कधीच नसावा,
          आणि, तोवरच आपण निघून जावं !
चालता बोलता नजर खाली असावी,
भाषा कशी मुलायम अन नम्र असावी, 
जणू सदैव साखर पेरीत जावी,
दुसऱ्याची सुखदुःखे स्वतःमध्ये शोधत जावी,
        आणि तोवरच आपण निघून जावं ! 
घराला - दाराला, घरातील माणसाला 
आपली अडचण वाटू नये,
आपल्याला पाहूनही न पाहील्याचे कोणि आपणांस कधी दाखवू नये,
जर्जर आपल्या शरीराचा भुईला भार वाटू नये,
आपली नाती आपल्यापासून दूर कधी जाऊ नये,
           वाटतं, तोवरच आपण निघून जावं..! 
डोक्यावर तळपता सूर्य असावा,
शीतल जलधारा बरसत असाव्या,
गुलाबी थंडीने अंग मोहरून निघावं,
गोधडीच्या उबेत शरीर निमालं असावं,
           असं सुख आहे, तोवरच आपण निघून जावं !
पायांना चरण स्पर्शाचा मान असावा,
आशीर्वादासाठी हात सदैव वरती व्हावा,
प्रेमाच्या धाकाचा हक्क असावा,
मायेचा आपण निवारा असावा,
          खरंतर, तोवरच आपण निघून जावं !
आकाशाचे रंग निरखीत असावेत,
सूर्याचे किरण शीतल असावेत,
पावसाळी ढगांनी रुपेरी रंग घ्यावेत,
इंद्रधनुष्याचे मुकुट धारण केलेले पाहावेत,
           हे भाग्य नशीबी आहे, तोवरच आपण निघून जावं !
निसर्गाच्या रंगानी आकाशावर लेपन करावं,
झाडांच्या कुंचल्यानी त्यावर कशीदा काम करावं, 
त्या मनमोहक आकृत्यानी मन कसं भरून जावं,
कल्पनेतील चित्रानी मनाला शांत करावं,
      मनांत ते आहे, तोवरच आपण निघून जावं !🌿🌿🌿
भास्कर पवार पुणे 

No comments: